डॉ. संदीप तांबारे व दिपक बारकुल यांना पुरस्कार जाहीर
येरमाळा प्रतिनिधी (सुधीर लोमटे) –
येरमाळा येथील डॉ. संदीप तांबारे यांना ‘पुण्य पुरस्कार’ तर पत्रकार दिपक बारकुल यांना ‘कै. अनंत भालेराव स्मृती स्पर्धा पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हे पुरस्कार जिल्हा मराठी पत्रकार संघ व पुण्यनगरी समूहाच्या वतीने प्रदान करण्यात येणार आहेत.
डॉ. संदीप तांबारे यांनी येडाई व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून समाजातील अनेक तरुणांना व्यसनमुक्त करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. धाराशिव जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्यातही ‘आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्र’ उभारून त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने अनेक व्यसनाधीन युवकांना नवे जीवन दिले आहे. त्यांच्या या समाजोपयोगी कार्याची दखल घेत त्यांना ‘पुण्य पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, दैनिक ‘सकाळ’चे येरमाळा येथील पत्रकार दिपक बारकुल यांनी गेल्या तीस वर्षांपासून पत्रकारितेद्वारे अन्यायाविरुद्ध आवाज उठवून सामाजिक, शेतीविषयक घटकांचे विषय आपल्या लेखणीतुन मांडून अनेकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या पुढाकारातून येरमाळा पत्रकार संघाच्या माध्यमातून गोर गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारण्यात आली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ‘कै. अनंत भालेराव स्मृती स्पर्धा पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
या दोन्ही पुरस्कारांचे वितरण पुण्यनगरी समुहाच्या आयोजित कार्यक्रमात रविवारी धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
या पुरस्कारांबद्दल सर्व स्तरातून डॉ. तांबारे आणि बारकुल यांचे अभिनंदन होत आहे.




















Total views : 9127