‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी! धाराशिवच्या राजकारणात नवा अध्याय; खासदार ओमराजे निंबाळकरांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
धाराशिव : जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात रविवारी एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारी राजकीय घडामोड घडली. राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि धाराशिवचे पालकमंत्री तथा ज्येष्ठ नेते मा. ना. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या समर्थक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांना नवे वळण दिले.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेल्या या राजकीय घडामोडीवर अखेर शिक्कामोर्तब झाले. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेश सोहळ्याने धाराशिवच्या राजकारणात शिवसेनेची ताकद अधिक भक्कम झाल्याचे चित्र स्पष्ट झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओमराजे निंबाळकर यांचे पक्षात स्वागत करताना विकास, जनसंपर्क आणि जनहिताच्या राजकारणासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, या प्रवेशामागे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांची राजकीय रणनीती, संघटन कौशल्य आणि जिल्ह्यातील वाढता प्रभाव निर्णायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक मजबूत होत असल्याचे चित्र या सोहळ्यातून दिसून आले.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला जिल्ह्यात नवसंजीवनी मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत होती. जिल्ह्यातील अनेक राजकीय समीकरणे बदलण्याची क्षमता असलेल्या या निर्णयामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची चिंता वाढल्याची चर्चा राजकीय जाणकारांमध्ये सुरू झाली आहे.
प्रचंड उत्साह, घोषणाबाजी आणि जल्लोषाच्या वातावरणात झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्याने धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या एकत्रित नेतृत्वामुळे शिवसेनेची ताकद आणखी वाढणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |




















Total views : 15038